खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल उडीद ही महत्वाची पिके गणली जातात. या दोन्ही पिकांची मिळून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सुमारे ७ ते ८ लाख हेक्टर क्षेत्रावर शेती होते. उडीद ही ७० ते ८० दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोडयाशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी ही दोन्ही पिके अतिशय महत्वाची आहेत.
जमीन
उडीद मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी, क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी.
पूर्वमशागत
चांगली पूर्वमशागत ही उडीद अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळयापूर्वी जमीन नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळवाच्या पाळ्या घ्याव्यात. काडी, कचरा, धसकटे वेचून घ्यावीत. याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
पेरणीची वेळ
उडीद ही दोन्ही पिके खरीप हंगामातील आहेत. त्यामुळे मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजे जूनचा दुसरा पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. पेरणी जसजशी उशिरा होत जाईल त्याप्रमाणे उत्पादनात मोठी घट होते.
सुधारित वाण
उडीदामध्ये काही मोजकेच वाण आहेत. त्यापैकी टीपीयू-४ व टीएयू-१ हे दोन वाण उत्कृष्ट गणले जातात. टीपीयू-४ व टीएयू-१ हे दोन्ही टपोऱ्या काळया दाण्यांचे वाण असून पक्वतेचा कालावधी ७० ते ८५ दिवसांचा आहे.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी व त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम जीवाणूची पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी. उडीद या पिकांच्या बियाणासाठी चवळी गटाचे रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरावे. ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते. रायझोबियम मुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.
पेरणीचे अंतर
उडीद ही पिके अतिशय कमी कालावधीची (७० ते ८० दिवस) असल्यामुळे सलग अथवा आंतरपीक म्हणून घेतले जाते. या दोन्ही पिकाचे पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांमधील अंतर १० सें.मी. राहील या बेताने पेरणी करावी. पेरणी पाभरीने करणे चांगले. या पिकामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावयाचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळीनतंर एक ओळ तूरीची पेरणी करावी.
बियाणे प्रमाण
१५-२० किलो/हेक्टर.
खतमात्रा
या दोन्ही पिकांना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद म्हणजेच १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाणालगत पेरुन द्यावी म्हणजे त्याचा प्रभाव चांगला होतो.
आंतरमशागत
सुरुवातीपासूनच पीक तणविरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. ही पिके ३० ते ४५ दिवस तण विरहीत ठेवणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक असते.
पाणी व्यवस्थापन
ही पिके सर्वस्वी पावसावर येणारी आहेत. या पिकांना फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा खुपच कमी झाला असेल तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे किंवा २% युरियाची फवारणी करावी.
पीक संरक्षण
उडीदावर रस शोषणाच्या किडी केसाळ अळया यांचा प्रादुर्भाव होतो. उडीदावरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ % ई.सी. १००० मिली ५०० लिटर पाण्यातून फवारावे. एखाद्या झाडावर केसाळ अळयांचा प्रार्दुभाव दिसताच ती झाडे उपटावीत व सर्व अळया नष्ट करुन टाकाव्यात. या पिकांवर प्रामुख्याने भूरी आणि पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. भूरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या खालील पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. तसेच पिवळा विषाणू या रोगाचा प्रसार पांढरी माशी या कीडीमार्फत होतो. या रोगामुळे कोवळया पानावर लहान पिवळे ठिपके दिसतात व थोडयाच दिवसात पानांच्या ब-याचशा भागावर अनियमित आकाराचे चट्टे दिसू लागतात. यामुळे उत्पादनात घट होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक १२५० ग्रॅम किंवा ५०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे. आवश्यकता भासल्यास ८-१० दिवसांनी आणखी एक फवारणी करावी. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रति हेक्टर प्रादुर्भाव दिसू लागताच धुरळणी करावी. तसेच शेंगा पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरान्ट्रानीलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २ मिली अथवा फ्ल्युबेंडामाईड ३९.३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १२.५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसू लागताच यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
काढणी
उडीदाची कापणी करुन खळयावर आणून त्याची मळणी करावी. उडीदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही. साठवणीपूर्वी मूग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट व ओलसर जागेत करु नये. साठवताना कडूनिंबाचा पाला (५%) धान्यात मिसळावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.
उत्पादन
अशाप्रकारे चांगली काळजी घेऊन वाढविलेल्या पिकापासून मूगाचे १२ ते १५ क्विंटल तर उडीदाचे १० ते १२ क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.