keli lagwad kashi karavi
केळी पाणी व्यवस्थापन

केळी पाणी व्यवस्थापन

जमीन
केळीसाठी मध्यम ते भारी, भरपुर सेंद्रीय पदार्थ असणारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.० च्या दरम्यान असावा.

क्षारयुक्त चोपण व चुनखडीयुक्त
जमिनीत केळीची लागवड करू नये.

लागवड हंगाम
मृग बाग (जून लागवड), कांदे बाग (ऑक्टोबर लागवड), फेब्रुवारी (खान्देश विभागासाठी).

केळीचे वाण
१) फुले प्राइड (नवीन प्रसारित वाण) २) ग्रॅड नैन ३) श्रीमंती.
केळी लागवडीचे अंतर चौरस पद्धत
१.५ x १.५ मी. (हेक्टरी ४,४४४ झाडे).

केळी कंद निवड व प्रक्रिया
केळी लागवडीसाठी कंद मुनवे निरोगी आणि जातीवंत बागेतूनच निवडावे. कंद ३ ते ४ महिने
वयाचे, ४५० ते ७५० ग्रॅ.वजनाचे आणि उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदावर ३- ४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावा. लागवडीसाठी आता उति संवर्धित
रोपांचाही पर्याय उपलब्ध आहे. उतिसंवर्धित रोपे एक सारख्या वाढीचे, ३० ते ४५
सेमी उंचीचे आणि किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत.

खत व्यवस्थापन
सेंद्रीय खते : शेण खत - १० किलो/झाड किंवा, गांडूळ खत-५ किलो/झाड.
जैवीक खते
अॅझोस्पिरीलम - २५ ग्रॅम/झाड व पी.एस.बी.-२५ ग्रॅम/झाड केळी लागवडीच्या वेळी .

रासायनिक खते
 केळीसाठी प्रति झाडास २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस
करण्यात आलेली आहे. जमिनीतून रासायनिक खते देतांना त्यांचा अधिक कार्यक्षमपणे उपयोग
होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीने किंवा कोली घेवून खते द्यावी.

सुक्ष्मअन्नद्रव्ये
केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात इडिटीए-जस्त आणि इडिटीए-लोह यांची प्रत्येकी ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. तसेच, पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीमधून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम प्रति झाड शेणखतात (१५० ग्रॅम) मुरवून वापरावे.

फर्टीगेशन
केळीच्या अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्र व पालाशयुक्त खतांच्या शिफारशीत मात्रेच्या ७५ टक्के मात्रा (१५० ग्रॅम नत्र आणि १५० ग्रॅम पालाश प्रति झाड)
तसेच स्फुरदाची एकूण ६० ग्रॅम प्रतिझाड हि मात्रा ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

पाणी व्यवस्थापन 
केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्म नलीका (मायक्रोट्युब) पद्धतीपेक्षा ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपरचा वापर करणे अधिक योग्य असते.
बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी, वाढीची अवस्था इ.बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास केळी पिकाची
पाणी वापरण्याची क्षमता आणि पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी मध्यम खोल काळ्या जमिनीत केळी लागवडीनंतर १ ते ५ महिन्यांपर्यत ६० टक्के बाष्पोत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढे पाणी,
६ ते ८ महिन्यांपर्यत ७० टक्के बाष्पपर्णोत्सर्जाची पूर्तता करण्याएवढे पाणी आणि ९ ते १२ महिन्यापर्यंत ८० टक्के बाष्पोत्सर्जनाची पूर्तता करण्याएवढे पाणी ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आली आहे.वरील पाण्याची मात्रा मार्गदर्शक असून बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार
आणि पीक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य तो बदल करावा.

आंतरमशागत
केळी बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी आडवी कुळवणी वेळीच करावी. लागवडीनंतर ३-४ महिन्यापर्यंत अशी कुळवणी करता येते. दर ३ महिने अंतराने टिचणी बांधणी करावी.
झाडांना मातीची भर द्यावी. केळीची पिल्ले धारदार कोयत्याने नियमित काढावीत. केळीची रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नये.
झाडे पडू नये म्हणून गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पॉलीप्रॉपीलीनच्या पट्टयांच्या सहाय्याने झाडांना आधार द्यावा.
•  केळी घडाची गुणवत्ता वाढविणे 
* घड पुर्ण निसवल्यावर केळफूल वेळीच कापावे.
* घडावर ८ ते ९ फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळीने सुरवातीलाच कापुन टाकाव्यात.
केळीचा घड पूर्ण निसवल्यावर व केळफूल तोडल्यावर त्यावर १० ली.पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम युरिया अधिक स्टीकर (१० मिली)
मिसळून फवारणी केल्याने लांबी आणि घेर वाढून केळीच्या वजनातही वाढ होते. किंवा केळफुल कापल्यानंतर एकदा व त्यानंतर ३० दिवसांनी दुसऱ्यांदा १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश मिसळून फवारणी करावी.
* केळीचे घड ०.५ मि.मी. जाडीच्या ७५ x १०० से.मी. आकाराच्या ६ टक्के सच्छिद्र प्लास्टिक पिशव्यांनी झाकावेत.

 आंतरपिके
 केळीबागेत हंगामनिहाय चवळी, उडीद, मुग, भुईमूग यांसारखी आंतरपिके घेता येतात. परंतु बागेत काकडी, भोपळा, कलींगड, खरबुज तसेच मिरची, वांगी यांसारखी पिके घेणे कटाक्षाने टाळावे.

केळीसाठी आच्छादानाचा वापर
 केळीच्या दोन ओळीत एकूण मोकळ्या जागेच्या ८०% जागेवर ३० मायक्रॉन जाडीचे चंदेरी रंगाचे पॉलीइथिलीनचे अच्छादन केळी लागवडीच्या टिचणी बांधणी केल्यानंतर करावे.

खोडवा व्यवस्थापन
केळीच्या पहिल्या खोडवा पिकासाठी मुख्य पीक निसवल्यानंतर २ महिन्यांनी एक जोमदार पील प्रती झाड ठेवावे. खोडवा केळीच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी मध्यम खोल काळ्या
जमिनीत मुख्य केळी पिकाचे घड कापणी केलेले खोड आहे. ते तसेच ठेऊन फक्त पाने कापून आच्छादन करणे व सोबत १५० ग्रॅम नत्र, ४५ ग्रॅम स्फुरद व १५० ग्रॅम पालाश ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस केली आहे.विपरीत हवामानाच्या काळात केळी बागेची घ्यावयाची काळजी.
अती व सततचा पाऊस
* बागेतुन अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* सततचा पाऊस असल्यास व जमीनितुन किंवा ठिंबकद्वारे खते देणे शक्य नसल्यास अशा परिस्थीतीत फवारणी द्वारे खते द्यावीत.
 सोसाट्याचा वारा
अतिवृष्टी बरोबरच वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटून प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो. तसेच वाऱ्यामुळे झाडे कोलमडूनही फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.
हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केळी बागेभोवती २ मी. अंतरावर सजीव कुंपनाच्या दोन ओळी केळी लागवडीच्या वेळीच लावाव्यात. सजीव कुंपणासाठी शेवरी, बांबू सुरु किंवा गिरीयुक्त यांचा वापर करावा.

कमी तापमान
* बागेत रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा करावा.
* भल्या पहाटे बागेत ओला पाला पाचोळा जाळून धुर करावा.
* केळीच्या झाडास पिक अवस्थेनुसार प्रति झाड २५० ते १००० ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी.
* घडास ६ % सच्छिद्रतेचे पांढऱ्या प्लॉस्टिक बॅगचे आवरण करावे. अतिजास्त तापमान * शिफारशी प्रमाणे पाणीपुरवठा करावा.
* बागेत केळी पाने व अवशेष, जुना गव्हाचा भुसा, ऊसाचे पाचट, सोयाबीन भुसा यांचा वापर करुन सेंद्रिय अच्छादन करावे.
* बागेत चारही बाजुने सजिव कुंपण करावे.
* एप्रील महिन्या पासून दर पंधरा दिवसांनी १० लीटर पाण्यात ८०० ग्रॅम केओलीने हे बाष्परोधक घेवून त्याची केळीची पानांवर  फवारणी करावी.
केळी पिकवणीसाठी किफायतशीर पिकवण कक्ष
केळी विक्री बऱ्याच वेळा टोकाकडील लहान राहिलेल्या फण्या व्यापारी कापून फेकून देतात ज्याला आपण वापसी केळी म्हणतो.
हे नुकसान ५-१० टक्के पर्यंत जाते. जर हीच केळी कमी खर्चात पिकवून स्थानिक बाजारपेठेत शेतकऱ्याने विकली तर नक्कीच आर्थिक फायदा होईल
या दृष्टीने किफायतशीर केळी पिकवणीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेल्या किफायशीर आंबा फल पिकवण तंत्रज्ञानात बदल करून
 नैसर्गिकरित्या केळी पिकविण्यासाठी सुधारीत वातानुकूलीत केळी पिकवण कक्षात केळीच्या फण्यांना १०० पी.पी. एम. तीव्रतेच्या इथिलीन वायूची प्रक्रिया २०+ २ सें.ग्रे.
तापमानात देऊन ९० टक्के सापेक्ष आद्रतेत २४ तास ठेवून केळी पिकवावी.
किफायतशीर पिकवण कक्षात केळी पिकवण्याची पध्दत :
३/४ पक्क केळीच्या फण्यांची निवड करणे.
फण्यातील केल कोंब कटरच्या सहाय्याने विलग करणे.
विलग केलेल्या केळीला ०.२ टक्के बुरशी नाशकाच्या द्रावणात
बुडवून प्रक्रिया करणे.
प्रक्रिया केलेली केळी प्लॅस्टिकच्या क्रेटस मध्ये ठेऊन पिकवण कक्षात ३-४ च्या स्तराप्रमाणे रचणे.
पिकवण कक्षाच्या ७४७४७ घन फुट आकारमानात ९० क्रेटस
मध्ये एकूण १ टन केळी पिकवणीसाठी ठेवता येते.
क्रेटस पिकवण कक्षात रचल्यानंतर ९० टक्के आर्द्रता निर्माण करण्यासाठी कक्षाच्या आंतरिक
चार ही बाजून पाण्यात भिजवलेली
सुती चादर टांगून घ्यावी आणि कक्ष बंद करून घ्यावा.
कक्षात असलेल्या विशिष्ट छिद्रातून बाहेरून इथिलिन सिलेंडर मधून ८ सेंकद इथिलीन वायू         (१०० पीपीएम) आत सोडावा.
वातानुकूलित कक्ष पिकवण कक्ष ठेवलेल्या खोलीचे तापमान वातानुकुलीत यंत्राच्या
 सहाय्याने २२ सें.ग्रे. वर ठेवाव.
 इथिलीन वायू आत सोडल्यापासून १२ तासांनी पुन्हा कक्षाचा पडदा २० मिनिटांसाठी उघडून ठेवावा जेणेकरून पिकवण प्रक्रियातून निर्माण झालेला कार्बनडायऑक्साईड
वायू (Co.) बाहेर निघेल. २० मिनिटानंतर पुन्हा कक्ष पुढील १२ तासांपर्यंत बंद ठेवावे. केळीला छान पिवळा रंग येण्याकरिता १२ तासानंतर वातानुकुलीत यंत्राचे   तापमान पुढील २४ तास २० सें.ग्रे. वर ठेवावे.
या २४ तासानंतर पिवळ्यारंगाची दर्जेदार केळी पिकवून तयार होईल. (महाराष्ट्र कृषि विद्यापीठ, संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती २०१७ या बैठकीत मान्यता).